पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीनेही आपला जीव गमावला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे आंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लक्ष्मण बाबू नागणे (वय 60) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय 55) अशी मृत शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. पहाटेच्या सुमारास शेती पंपाची वीज सुरू झाल्यानंतर नदीकाठी असलेली मोटार बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे शेतात गेले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे परिसरात विद्युत प्रवाहाशी संबंधित बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोटार हाताळत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच विव्हळू लागले.
पती अडचणीत असल्याचे पाहताच अलका नागणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पतीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ओलसर वातावरण आणि पसरलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांनाही तीव्र विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत काही क्षणांतच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही आधारस्तंभ गमावल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण आहे.
दरम्यान, या गरीब शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच पावसाळ्याच्या काळात शेतातील विद्युत उपकरणे वापरताना आणि हाताळताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




