शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेत नवीन गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश असल्याने ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बंडानंतर पक्षांतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वादही चांगलाच चिघळला आहे. फुटीर खासदारांवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर संजय दिना पाटील यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी झाल्याची चर्चा रंगली होती. या घटनेबाबत संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
याचवेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील खासदार आणि आमदारांना वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र या दाव्याला संजय दिना पाटील यांनी फेटाळून लावत, अशा कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे सांगितले. उलट आपल्या भूमिकेबाबत एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करत शाबासकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील या नव्या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला असून पुढील काळात या वादाचे पडसाद अधिक उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




