पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांचा सभात्याग; ‘पोराटोरांच्या नादाला लागू नका’ म्हणत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला आणि मविआ काळातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची करून दिली आठवण
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस कमालीचा वादळी ठरला. मंगळवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची उत्तरे इतर मंत्र्यांकडे सोपवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, ज्याला नंतर सभागृहात दाखल झालेल्या एकनाथ शिंदेंनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.
अध्यक्षांनी विरोधकांच्या आक्षेपावर बोलताना २०१९-२० मधील उदाहरणे दिली. यावर आक्षेप घेत आदित्य ठाकरे म्हणाले की, “पूर्वी काय घडले हे रेकॉर्डवरून काढले पाहिजे, सभागृहात चुकीची माहिती येता कामा नये. जर मंत्र्यांना उत्तरे देता येत नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे.” आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर विरोधकांनी गदारोळ करत सभागृहातून सभात्याग केला. मात्र, विरोधक बाहेर पडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात हजर झाले आणि त्यांनी थेट आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. “तुमचे मित्र कुठे गेले, घरी गेले का?” असा सवाल करत शिंदेंनी, “काल लागलेल्या झटक्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,” असा थेट टोला लगावला.
“कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!… सभागृहाचे कामकाज सामूहिक जबाबदारीवर चालते. २०१९ ते २०२२ दरम्यान महाविकास आघाडीच्या काळातील मुख्यमंत्री सभागृहात किती वेळ बसायचे आणि उत्तरे कोण द्यायचे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत.” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आदित्य ठाकरेंवरच नाही, तर विरोधी पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांवरही निशाणा साधला. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांचा उल्लेख करत, “तुम्हीही त्या पोराटोरांच्या नादाला लागलात,” असे शिंदे म्हणाले. विरोधकांचा हेतू फक्त स्टंटबाजी करण्याचा असून त्यांना प्रश्नांची उत्तरे ऐकण्यात रस नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला खंबीर असून, गेल्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांना ४५ हजार कोटींची मदत करून महायुती सरकार जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




