अमेरिका-इराणमधील घडामोडींमुळे तेलाचे भाव ५ टक्क्यांनी घसरले; भारताकडे निघाली कच्च्या तेलाची जहाजे
जागतिक बाजारपेठेतून कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमतींबाबत एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या दरात एकाच दिवसात तब्बल ५ टक्क्यांहून अधिकची मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यापार सत्राच्या सुरुवातीला ८२ डॉलर प्रति बॅरलवर असलेले कच्चे तेल बाजार बंद होताना थेट ७६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली घसरले. अमेरिका आणि इराण यांच्यातील ताज्या भू-राजकीय घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात हे सकारात्मक वातावरण तयार झाले असून, यामुळे भारतीय ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या आघाडीवर लवकरच ‘अच्छे दिन’ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
इराणने आपले अणू प्रकल्प बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सहमती दर्शवली नसली, तरी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विक्रीसाठी दोन महिन्यांची विशेष सवलत दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इराणचे तेल आता जागतिक बाजारात उपलब्ध होणार असून, व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘होर्मूझचा समुद्रधुनी’ (Strait of Hormuz) देखील खुला झाला आहे. यामुळे विस्कळीत झालेली जागतिक तेल पुरवठा साखळी पुन्हा पूर्ववत होण्यास मदत मिळणार आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी कच्चे तेल ७७.५२ डॉलरवर बंद झाले होते, तर मंगळवारी सकाळी आखाती देशांतील क्रूड ७७.७२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले होते. दुसरीकडे, अमेरिकन क्रूड ‘डब्ल्यूटीआय’चे (WTI) भाव ४.५३ टक्क्यांच्या घसरणीसह ७३ डॉलर प्रति बॅरलवर आले असून मंगळवारी ते ७४ डॉलरच्या आसपास व्यापार करत होते.
या जागतिक घडामोडींचे भारतीय बाजारात लवकरच सकारात्मक परिणाम दिसू लागतील, असे संकेत खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिले आहेत. परदेशातून स्वस्त कच्च्या तेलाची खेप भारतात पोहोचताच देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, इराणचा सागरी मार्ग मोकळा होताच भारतासाठी कच्चे तेल घेऊन निघालेली चार मोठी जहाजे समुद्रात झेपावली आहेत. कच्च्या तेलातील या घसरणीमुळे देशातील सरकारी तेल कंपन्यांचा पेट्रोल-डिझेल विक्रीतील तोटा भरून निघणार असला, तरी सध्या कंपन्यांना नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) दराअभावी रोज ६०० कोटी रुपयांचे मोठे नुकसान सोसावे लागत आहे.




