ODI : ‘फॉर्मात या, नाहीतर रस्ता मोजा!’ भारतीय प्रशिक्षकांचा स्टार खेळाडूला थेट इशारा

spot_img

२०२७ वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियात चुरस; ‘या’ मॅचविनरचे संघातील स्थान धोक्यात

भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळत असून, या मालिकेकडे २०२७ च्या वर्ल्ड कप तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. या दीर्घकालीन नियोजनात प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसतानाच, संघात स्थान टिकवण्यासाठी खेळाडूंना प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी संघातील एका स्टार मॅचविनर खेळाडूला थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे.

टीम इंडियाचा प्रमुख चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याचा सध्याचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी कुलदीपला खडेबोल सुनावले. आयपीएल २०२६ मधील अत्यंत सुमार कामगिरीमुळे कुलदीपला आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टी-२० संघातून आधीच डच्चू मिळाला आहे. त्यातच अफगाणिस्तानविरुद्धच्या चालू मालिकेत धरमशाला येथील पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही, तर लखनौ येथील दुसऱ्या सामन्यात संपूर्ण १० षटके टाकूनही त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

टेन डोशेट यांनी स्पष्ट केले की, आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज फिरकीपटूंवर सहजपणे आक्रमण करत असल्याने गोलंदाजांना सातत्याने स्वतःमध्ये बदल करावे लागतील. ते म्हणाले, “आम्हाला संघात नेहमीच मिस्ट्री किंवा रिस्क स्पिनर हवा असतो, यात शंका नाही. मात्र, सध्या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. कुलदीप आणि इतर फिरकीपटूंना नवीन प्रयोगांवर काम करावे लागेल, ज्यासाठी आमचे स्पिनर कोच साईराज बहुतुले सज्ज आहेत. कुलदीपच्या प्रतिभेत कोणतीही त्रुटी नाही, पण जर त्याला संघात आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर त्याला तातडीने फॉर्मात येऊन पुनरागमन करावेच लागेल. कारण सध्या अनेक युवा खेळाडू त्याच्या जागेसाठी शर्यतीत आहेत.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ