Rajabhau Waje : ‘१५० कोटींची ऑफर लाथडली!’; नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे ठरले ‘ठाकरांचे निष्ठावंत टायगर’, नाशिक स्थानकावर जल्लोष!

spot_img

शिवसेनेच्या ६ खासदारांच्या बंडखोरीनंतरही ठाकरेंसोबत ठाम राहणारे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकमध्ये ऐतिहासिक स्वागत; पक्षनिष्ठेची राज्यभरात चर्चा.

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या तोंडावर ठाकरे गटाला ६ खासदारांच्या बंडखोरीमुळे मोठा धक्का बसला असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दाखवलेली निष्ठा सध्या राजकारणात कौतुकाचा विषय ठरली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाच्या अनेक खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. मात्र, समोर आलेली कोट्यवधी रुपयांची आमिषे आणि दबावाला न जुमानता राजाभाऊ वाजे हे आपल्या पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहिले. दिल्लीतील संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर राजाभाऊ वाजे यांचे नाशिक रेल्वे स्थानकावर आगमन झाले, तेव्हा हजारो शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अभूतपूर्व स्वागत केले.

या राजकीय भूकंपाच्या मागे गेल्या तीन-चार महिन्यांपासून मोठी फिल्डिंग लावली जात असल्याचा खळबळजनक खुलासा राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केला आहे. १४ एप्रिल रोजी वाजे यांच्या निवासस्थानी एका विशेष कमिटीने भेट दिली होती. या भेटीदरम्यान राजाभाऊंना तब्बल ५० कोटी रुपये रोख आणि मतदारसंघात १०० कोटी रुपयांच्या विकासकामांची बंपर ऑफर देण्यात आली होती, असा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. परंतु, स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा गहाण न ठेवता राजाभाऊंनी या महाकाय ऑफरला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सध्या ठाकरे गटाकडे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीनच खासदार शिल्लक राहिले असून वाजे यांच्या या धाडसी निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

नाशिकमध्ये दाखल होताच खासदार राजाभाऊ वाजे यांनी अत्यंत भावनिक आणि ठाम शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी ज्या विचारधारेमुळे आणि ज्या जनतेमुळे, लहान-थोर लोकांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो आहे, त्या विचारधारेशी आणि मतदारांशी कधीही प्रतारणा करणार नाही. मी घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे आणि मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे,” असे वाजे म्हणाले. गद्दारीच्या या वादळात वाजे यांनी दाखवलेल्या या अढळ निष्ठेमुळे नाशिकमधील शिवसैनिकांचे त्यांच्यावरील प्रेम अधिकच गडद झाले असून, रेल्वे स्थानक परिसर ‘राजाभाऊ वाजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ आणि ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ