देशाच्या राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रस्तावित आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला अधिकृत परवानगी मिळाल्याने या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह अनेक समर्थक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटत असून, मनोरंजन विश्वातील काही व्यक्तींनीही आपली मते व्यक्त केली आहेत.
याचदरम्यान अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. त्यांनी देशातील तरुणांना उद्देशून भावनिक संदेश देत, आपल्या पिढीकडून झालेल्या काही चुका आणि अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्यांची कबुली दिली. समाजातील अनेक गंभीर प्रश्न पुढील पिढीकडे ढकलले गेल्याचे नमूद करत त्यांनी युवकांची माफीही मागितली.
आपल्या संदेशात अतुल कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही देशाची मूलभूत मूल्ये असल्याचे सांगत तरुणांनी संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत देशाला अधिक चांगल्या दिशेने नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, आंदोलनाच्या चर्चेसोबतच त्यांच्या विचारांचीही व्यापक चर्चा होत आहे.




