मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीत विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीदरम्यान मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेचा विशेष आढावा घेण्यात आला. राज्यभरात लाखो कुणबी नोंदी उपलब्ध असतानाही त्यानुसार प्रमाणपत्रांचे वितरण अपेक्षित प्रमाणात का झाले नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्या कारणांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित प्रकरणाची तपासणी केली असता प्रमाणपत्र वितरणात झालेल्या विलंबाबाबत काही त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून हालचालींना वेग आल्याचे या घडामोडींमधून दिसून येत आहे.




