इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध दोन महिने उलटूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याने संपूर्ण जगावर ऊर्जेचे भीषण संकट ओढवले आहे. युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत दोन्ही देशांनी केलेल्या कडक नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाचा आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. याच तणावादरम्यान, १८ खलाशी असलेल्या एका भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र किंवा ड्रोनने भीषण हल्ला करण्यात आला असून, हे जहाज समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न झाला आहे.
या दुर्दैवी घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, भारत सरकार आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराण किंवा अमेरिका यांपैकी कोणीही स्वीकारली नसली, तरी भारतीय जहाजांना थेट लक्ष्य केले जात असल्याने केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मृताचा देह सन्मानाने मायदेशी आणण्यासाठी आणि जखमींवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, होर्मुज खाडीत अडकलेल्या इतर भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय अधिकारी सातत्याने जहाज मालकांच्या संपर्कात आहेत.




