मराठवाडा-विदर्भात सोसाट्याचा वारा आणि पाऊस, तर मुंबई-ठाण्यात आर्द्रतेमुळे उकाड्याचा कहर वाढणार
महाराष्ट्राच्या हवामानात येत्या तीन दिवसांत मोठे फेरबदल होणार असून, राज्याच्या विविध भागांत पावसासह सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचे आगमन होणार असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बीड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागातही पावसाच्या सरी कोसळतील, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
एकीकडे राज्याचा काही भाग पावसाने चिंब होणार असताना, मुंबई आणि ठाणेकरांच्या नशिबात मात्र पावसाचा शिडकावा नसल्याचे चित्र आहे. मुंबईत पावसाच्या धारांऐवजी आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कमी असली, तरी प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांची ‘जीवाची लाहीलाही’ होणार आहे. हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या मते, या काळात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. एप्रिलमधील कडाक्याच्या उन्हाच्या तुलनेत तापमान थोडे कमी असले, तरी हवेतील ओलावा वाढल्यामुळे उकाडा आणि तगमग अधिक जाणवेल.
वाढत्या उष्णतेच्या आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी १० मे पर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तळकोकणातही काही ठिकाणी अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ८, ९ आणि १० मे या तीन दिवसांत मुंबई महानगर प्रदेशात हवेची हालचाल मंदावल्यामुळे उकाड्याची तीव्रता सर्वोच्च पातळीवर असेल. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ओल्या दुष्काळाची भीती नसली तरी अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे खबरदारी घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.




