नाशिक येथील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निदा खानबाबत नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मानल्या जाणाऱ्या निदा खान ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भावती असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणामुळे आधीच राज्यभरात मोठी चर्चा सुरू असताना, या नव्या खुलाशामुळे आणखी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर निदा खानची युरिन प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून तिच्या सुरक्षेसह आरोग्याबाबतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, प्रकरण उघडकीस आल्यानंतर निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आपण गर्भवती असल्याचे कारण देत पुन्हा जामीन मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु न्यायालयाकडून तिला कोणताही दिलासा मिळाला नाही.
तपास यंत्रणेला दोन दिवसांपूर्वीच निदा खान छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही घाई न करता संबंधित परिसराची गुप्तपणे पाहणी केली. खात्री झाल्यानंतर सापळा रचत तिला अटक करण्यात आली.
या प्रकरणात धर्मांतर, फसवणूक आणि लैंगिक शोषणासंदर्भातील गंभीर आरोप असल्याने पोलिसांकडून तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. आरोपींशी संबंधित इतर दुव्यांचाही शोध घेतला जात असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




