छत्रपती संभाजीनगर येथे जलयुक्त शिवार २.० अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सर्व प्रलंबित कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासाठी तालुकास्तरावरील यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच इतर जलसंधारण उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कामांची प्रगतीही तपासण्यात आली.
सन २०२५-२६ मध्ये गाळ काढण्याच्या २०० कामांना मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी ११९ कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे २०.९५ लाख घनमीटर गाळ काढून तो १८७१ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला असून, यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. याशिवाय, आगामी वर्षासाठी ४८ नाल्यांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून सुमारे ७.५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी अंदाजे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यात हजारो कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत. विशेष निधीतून मंजूर झालेल्या १९६९ कामांपैकी १६८६ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ६२ गावांमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी कामे सुरू असून, यामुळे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. बैठकीत जिल्हा परिषद, वन विभाग, कृषी विभाग तसेच भूजल विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नाला खोलीकरणासारख्या कामांना प्राधान्य देत जलसंधारणाची गती वाढवण्याचे निर्देश दिले, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यात अधिकाधिक पाणी साठवण शक्य होईल.




