पुणे जिल्ह्यातील भोर-नसरापूर परिसरात घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. साडे तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने समाजमन हेलावून गेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी थेट संपर्क साधून या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांना ठोस आणि निर्विवाद पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून आरोपीला न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा मिळू शकेल. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून शक्य तितक्या लवकर निकाल लावण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद भोर आणि नसरापूर परिसरात उमटले आहेत. संतप्त नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला. स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असून आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती समोर येत असून, अशा व्यक्तीला समाजात राहण्याचा अधिकार नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कायदेशीर कलमे लावून न्यायप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामुळे महिलां व बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.




