मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर झाला असला, तरी काही प्रवाशांच्या बेफिकीर वर्तनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू होऊन अवघे दोन दिवस झाले असताना अनेक जण या मार्गावर गाड्या थांबवून सेल्फी आणि फोटो काढताना दिसत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत असल्याने महामार्ग पोलिसांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, मिसिंग लिंकवर वाहनांचा वेग साधारणपणे 100 ते 120 किमी प्रतितास असतो. अशा वेगवान मार्गावर अचानक वाहन थांबवणे केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतर प्रवाशांसाठीही मोठा धोका निर्माण करू शकते. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आर्थिक दंड आकारला जाईलच, शिवाय गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाचा मुख्य उद्देश घाटातील वळणं कमी करून वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या घटवणे हा आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी झाला आहे. 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. सुरुवातीला एक मार्ग खुला करण्यात आला होता, मात्र आता दोन्ही दिशांनी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
प्रकल्प सुरू झाल्यापासून अपघात आणि कोंडीच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याचा दावा संबंधित यंत्रणांनी केला आहे. पूर्वी दररोज येणारे अपघातांचे कॉल आता जवळपास थांबले आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत झाला आहे. तरीही, काही प्रवासी सोशल मीडियासाठी फोटो किंवा रील्स काढण्याच्या नादात नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे की, मिसिंग लिंकवर कुठेही थांबू नये आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करूनच प्रवास करावा.




