ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर; ४ मे रोजी जाहीर होणार अंतिम निकाल
देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान काल पार पडले असून, आता सर्वांच्या नजरा ४ मे रोजी लागणाऱ्या निकालांकडे आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालचा रणसंग्राम सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. बंगालची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
निवडणूक संपल्यानंतर आलेल्या विविध एक्झिट पोल्सनी संमिश्र कल दाखवले आहेत. पीपल्स पल्स आणि जनमत पोल यांनी पुन्हा एकदा तृणमूलची सत्ता येण्याचे संकेत दिले आहेत, तर इतर अनेक पोल्सनी भाजपचे पारडे जड असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान, अचूक अंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फलोदी सट्टा बाजाराने भाजपला १५० ते १५२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवून मोठी खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर सट्टा बाजाराने भाजपच्या जागांच्या आकड्यात मोठी वाढ दाखवली असून तृणमूलला १३७ ते १४० जागा मिळतील असे म्हटले आहे. आता या अंदाजांप्रमाणेच प्रत्यक्ष निकाल लागणार की ममता दीदी आपला गड राखणार, हे ४ मे रोजी स्पष्ट होईल.




