मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर भाजप-शिवसेना महायुती सत्तेत आल्यानंतर रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौर म्हणून संजय घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र महापौर झाल्यानंतरही रितू तावडे यांना अधिकृत निवासस्थानी राहता आलेले नाही. त्या सध्या घाटकोपर येथील त्यांच्या घरातूनच महापालिका मुख्यालयात ये-जा करत आहेत.
यामागचे मुख्य कारण म्हणजे राणी बागेतील महापौरांचा अधिकृत बंगला गेल्या चार वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरातील हा हेरिटेज बंगला पूर्वीही महापौरांच्या निवासासाठी वापरला जात होता. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात त्या येथे वास्तव्यास होत्या. मात्र त्यानंतर या बंगल्याकडे दुर्लक्ष झाले आणि कोणतीही देखभाल करण्यात आली नाही.
दरम्यान, पूर्वी दादर-शिवाजी पार्क येथील महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वापरला जात असल्याने राणी बागेतील बंगला हा एकमेव पर्याय उरला आहे. नवीन महापौर निवडून आल्यानंतरही प्रशासनाने वेळेवर दुरुस्ती न केल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. आता या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या कामांमध्ये फर्निचर दुरुस्ती, शौचालयांचे नूतनीकरण, नवीन बेडरूम्स, आधुनिक स्वयंपाकघर, इटालियन मार्बल फ्लोअरिंग आणि पारंपरिक झुंबरे यांचा समावेश आहे.
महापौर तावडे यांनी १ मेपासून या बंगल्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र कामाच्या विलंबामुळे ते शक्य झाले नाही. आता दुरुस्तीला सुरुवात झाल्यानंतरच त्यांचा अधिकृत निवासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.




