Mumbai News : बिर्याणी नंतर खाल्ले कलिंगड; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

spot_img

मुंबईतील पायधूनी भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. संशयित अन्न विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने या घटनेने अधिकच गंभीर वळण घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने शनिवारी रात्री इतर नातेवाईकांसोबत जेवण केले होते. जेवणामध्ये त्यांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडही खाल्ल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले, परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत गेला. कुटुंबातील दोन मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी प्रथम एका मुलीला मृत घोषित केले, तर काही तासांत दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचाही मृत्यू झाला.

या घटनेत मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा व झैनब अशी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ