Sanjay Raut : “मराठी माणसावर भुंकण्यासाठी भाजपने ‘कुत्रे’ पाळलेत!”; संसदेतील गदारोळावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती प्रहार

spot_img

ठाकरे कुटुंबाच्या बदनामीवरून राऊत आक्रमक; महिला आरक्षण विधेयकावरून भाजपच्या ‘ढोंगी’पणावर डागली तोफ

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे माजी नेते कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण सिंह यांचा उल्लेख करताच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर देताना थेट आदित्य ठाकरे यांचे नाव ओढले. यावरून सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. या घटनेवर शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. “मराठी माणसावर आणि महाराष्ट्राच्या नेत्यांवर भुंकण्यासाठी भाजपने काही कुत्रे पाळून ठेवले आहेत, अशा शब्दांत राऊतांनी निशिकांत दुबे यांच्या विधानाचा निषेध केला. तसेच, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना या प्रकरणावरून लाज वाटली पाहिजे,” अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना म्हटले की, “एकीकडे पंतप्रधान महिला आरक्षणाचे बिल सर्वानुमते मंजूर करण्याचे आवाहन करतात आणि दुसरीकडे त्यांचेच खासदार संसदेत बलात्कार करणाऱ्या आरोपींचे समर्थन करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे.” कुलदीप सेंगरसारख्या गुन्हेगाराची बाजू संसदेत मांडली जाणे ही लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचे ‘चरित्र आणि ढोंग’ या प्रकरणातून उघड झाले असून, महिलांच्या सुरक्षेबाबत बोलण्याचा अधिकार या पक्षाला उरलेला नाही, असेही राऊत यांनी स्पष्टपणे सुनावले.

आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “केवळ ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी भाजपने एक खोटा माहोल तयार केला होता. आदित्य ठाकरेंना विनाकारण टार्गेट करून भाजपने आपल्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन केले आहे.” संसदेसारख्या पवित्र व्यासपीठाचा असा गैरवापर होणे हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप किती खालच्या थराला गेला आहे, याचेच प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. “आज तुम्ही ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या हल्ल्यांची मजा बघत आहात, पण एक दिवस हेच तुमच्यावर उलटणार आहे, हे लक्षात ठेवा,” असा इशारा देत राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही खडसावले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ