भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपांपलीकडे आता या प्रकरणाचा आर्थिक घोटाळ्यांशीही संबंध उघड होत असून तपासाची व्याप्ती वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबीयांवरही चौकशीची टांगती तलवार आहे. त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली असून पुढील पाच दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तपासादरम्यान शिर्डीतील एका पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर एकूण चार खाती असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांमधून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली असून या पैशांचा स्रोत आणि व्यवहारांची साखळी काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.
याशिवाय, संबंधित पतसंस्थांमध्ये अशोक खरात नॉमिनी असलेली अनेक खाती असल्याचेही उघड झाले आहे. या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून विविध पोलीस यंत्रणा यात सहभागी आहेत.
या सर्व घडामोडींमुळे खरात प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, संबंधित व्यक्तींवर तपासाचा फास हळूहळू आवळला जात असल्याचे चित्र दिसत आहे.




