Maharashtra Bhavan In Mauritius : मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

spot_img

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील जुने सांस्कृतिक आणि भावनिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मॉरिशसमधील मोका येथे “महाराष्ट्र भवन”च्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी सोहळा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या इमारतीमुळे परदेशात राहणाऱ्या मराठी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांनी तेथील प्रमुख नेत्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. धर्मबीर गोखूल यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेसारख्या विषयांवर सविस्तर संवाद झाला. यावेळी मॉरिशसला “भारताचा लहान भाऊ” असे संबोधत भारताच्या नेतृत्वाचे कौतुकही करण्यात आले.

तसेच, मॉरिशसचे विविध मंत्र्यांसोबतही बैठका घेण्यात आल्या. यात तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणे, सांस्कृतिक देवाणघेवाण, वाचनालय उभारणी आणि जागरी नृत्याच्या युनेस्को मान्यतेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

या दौऱ्याचा विशेष भाग म्हणजे महाराष्ट्र भवनाच्या नव्या इमारतीतील सभागृहाला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय, ज्याला स्थानिक मराठी समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय, मॉरिशसमधील मराठी संस्थांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्यही प्रदान करण्यात आले.

या सर्व उपक्रमांमुळे महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांना नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ