कोकणची ओळख असलेला आणि जगभर प्रसिद्ध असलेला हापूस आंबा यंदा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. हवामानातील अनिश्चित बदलांमुळे यावर्षी हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून ते केवळ 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घसरणीचा थेट परिणाम आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असून त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. “जगायचं कसं आणि कुटुंब सांभाळायचं कसं?” असा प्रश्न अनेक बागायतदारांना पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आनंद देसाई यांच्यासारखे अनेक शेतकरी यंदाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे हतबल झाले आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. या आंब्याशी संबंधित व्यवसायातून दरवर्षी सुमारे 2500 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने वाहतूक, पॅकिंग, लाकूड, गवत, मजुरी अशा सर्व पूरक क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.
हापूस हंगामात मोठ्या प्रमाणावर येणारे बाहेरील आणि स्थानिक मजूर यंदा कामाअभावी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांनाही मजुरी देणं कठीण होत असून अनेकांवर आधीपासून असलेलं कर्ज वाढत चाललं आहे.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनाची मागणी केली आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाकडून योग्य सल्ला आणि उपाययोजना मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे जगभर गाजणारा कोकणचा हापूस, आणि दुसरीकडे त्याच्यामुळे जगणारा शेतकरी—यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दोघांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी सध्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी झगडताना दिसत आहे.




