ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढलेल्या ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत तब्बल २३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत आरोपींकडून १३७ किलो वजनाचे तांब्याचे तारे आणि पट्ट्या तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ८ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्गम भागात असलेल्या विद्युत रोहीत्रांवर ही टोळी लक्ष ठेवून चोरी करत होती. अशा ठिकाणी सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने तपास करणे आव्हानात्मक ठरत होते. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यांची पद्धत, वेळ आणि ठिकाणांचा सखोल अभ्यास करून तपासाची दिशा ठरवली. गोपनीय माहितीच्या आधारे तळेगाव ढमढेरे परिसरात सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी पुणे ग्रामीण भागातील विविध ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीने नारायणगाव, खेड, जुन्नर, रांजणगाव, शिरूर, जेजुरी, सासवड, दौंड, उरुळी कांचन आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांना मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोलीस अंमलदार, दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजु मोमीण, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.




