स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आज राज्यभरात आदरांजली वाहिली जात आहे. या निमित्ताने वधू बुद्रुक आणि तुळापूर येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त आणि शंभूभक्त या ठिकाणी दाखल होत असून, समाधीस्थळावर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम दिवसभर पार पडत आहेत.
गेल्या 40 दिवसांपासून भक्तांकडून ‘बलिदान मास’ पाळला जातो. या काळात अनेक जण आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करतात, मांसाहार टाळतात आणि साधेपणाने जीवन जगतात. आजच्या दिवशी या व्रताची सांगता होत असून, भक्त मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. या सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. श्रद्धा, इतिहास आणि प्रेरणा यांचा संगम असलेला हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.




