“कार्यक्रमानिमित्त भेट झाली असेल, त्यात त्यांची चूक नाही” – भरणे यांची स्पष्ट भूमिका.
रूपाली चाकणकर यांचं नाव भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भारणे यांनी चाकणकर यांची ठामपणे बाजू घेतली आहे. भरणे यांनी स्पष्ट केलं की, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा दर्शनासाठी कोणाला भेटणं ही सामान्य गोष्ट आहे आणि त्यावरून कोणावर आरोप करणं योग्य नाही. त्यांच्या मते, चाकणकर स्वतःहून त्या व्यक्तीकडे गेलेल्या नसून, एखाद्या निमित्ताने भेट झाली असण्याची शक्यता आहे.
भरणे म्हणाले की, “आपण एखाद्या ठिकाणी गेलो असताना स्थानिक लोकांनी एखाद्या महाराजांचं दर्शन घ्यायला सांगितलं, तर आपणही तसं करतो. त्या व्यक्तीबद्दल आधी माहिती नसते, मग तो खरा की भोंदू हे कसं कळणार? त्यामुळे अशा भेटीवरून दोष देणं योग्य नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की, आपल्या संस्कृतीत अनेक जण श्रद्धेने कुणाला गुरु मानतात, त्यामुळे अशा गोष्टींना वेगळा अर्थ लावणं चुकीचं आहे. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांची कोणतीही चूक नसल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं.दरम्यान, या वादामुळे राजकीय वातावरण तापलं असून, विविध स्तरांवरून प्रतिक्रिया येत आहेत.




