अलिकडेच एका कार्यक्रमात तान्या मित्तलने निर्माती एकता कपूर सोबत उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात तान्याने भगव्या रंगाची आकर्षक साडी नेसली होती. त्या साडीच्या पदरावर भगवान राम आणि माता सीता यांचे चित्र असल्याचे दिसत होते. रेड कार्पेटवर तिने या साडीमध्ये पापाराझींसमोर पोझही दिल्या.
मात्र कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तान्या आपल्या साडीच्या पदराने एकता कपूरचा चेहरा पुसताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. ही बाब चंद्रिका दीक्षितला खटकली आणि तिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत तान्यावर निशाणा साधला.
चंद्रिकाने हा व्हिडिओ शेअर करत सांगितले की, तिचे तान्या मित्तलशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडिओतील एक गोष्ट तिला अयोग्य वाटली. भगवान राम आणि माता सीता यांचे चित्र असलेल्या साडीच्या पदराचा असा वापर करणे योग्य नाही, असे तिचे मत आहे.
तिने आपल्या व्हिडिओमध्ये असेही म्हटले की, जर अशी कृती तिने केली असती तर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असती. मात्र या घटनेवर कोणीही आवाज उठवत नसल्याचे तिने नमूद केले. शेवटी “जय श्री राम” असे म्हणत तिने आपली भूमिका मांडली.
दरम्यान, हा व्हिडीओ आणि त्यावर चंद्रिकाने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.




