यंत्रणा कोलमडली, MIDC मधील ७५% कामगार कमी; सर्वपक्षीय बैठकीची आग्रही मागणी
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधन आणि LPG गॅसचा तुटवडा आता सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. या गंभीर संकटावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. “देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात एलपीजीची वितरण यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असताना सरकार वास्तव का लपवत आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बारामती, पुणे, नाशिक आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांत घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर्सचा मोठा तुटवडा असून, लोकांसाठी ही परिस्थिती आता मारामारीपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सुप्रिया सुळे यांनी केवळ राजकीय टीका न करता उद्योगांमधील भीषण वास्तवही मांडले. गॅसअभावी एमआयडीसींमधील (MIDC) ७५ टक्के कामगारांना कामावरून कमी करावे लागत असून अनेक छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. “हा केवळ राजकीय विषय नसून गृहिणींच्या आणि श्रमिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. सरकारने ४ वाजता दिलेल्या सरकारी आकडेवारीपेक्षा जमिनीवरचे वास्तव खूप वेगळे आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व चॅनेल्सवरील वस्तुस्थिती पाहण्याचे आवाहन केले.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने केंद्र सरकारने या विषयावर तातडीने निवेदन द्यावे आणि परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. लग्नसराईच्या काळात गॅस मिळत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, त्यामुळे अहंकाराचा मुद्दा न करता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवून यावर तोडगा काढावा, असे त्यांनी सुचवले. “तुम्ही कितीही डोळे बंद केले तरी जनतेच्या रांगा आणि त्यांचे हाल लपणार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना वास्तवाचे भान करून दिले.




