spot_img

Sanjay Raut : देशाची मानहानी थांबवा आणि खोटं बोलू नका” संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर घणाघाती प्रहार

spot_img

इराण-इस्रायल संघर्ष आणि ट्रम्प यांच्या दबावावरून राऊतांनी केंद्र सरकारला धरले धारेवर

राज्यातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता शाब्दिक ठिणग्या उडू लागल्या आहेत. “इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, काँग्रेस केवळ अफवा पसरवत आहे,” या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, “पंतप्रधानांनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन करू नये,” असा घणाघात केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची होणारी मानहानी आणि देशांतर्गत महागाईला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी इंधन टंचाईचा थेट संबंध देवस्थानांशी जोडत सरकारवर हल्ला चढवला. “शिर्डीच्या साई संस्थानात भक्तांना दोन ऐवजी एकच लाडू दिला जातोय आणि जेवणात चपातीची कपात केली आहे. हे सर्व गॅस आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे घडत आहे. किमान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबईतील ४० टक्के रेस्टॉरंट्स बंद पडल्याने हजारो लोकांचा रोजगार गेल्याचा दावा करत, ही राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांची नामुष्की असल्याचे त्यांनी म्हटले. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागे घेण्यावरून आणि इराण-इस्रायल संघर्षावर मौन बाळगण्यावरून त्यांनी मोदींवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत असल्याची बोचरी टीका केली.

देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित करताना राऊत म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतही ट्रम्प यांची परवानगी घ्यावी लागणे हा भारताचा सन्मान नसून मानहानी आहे. “मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ भाजपचे?” असा सवाल करत त्यांनी आगामी काळात होणाऱ्या सत्ताबदलाचा इशारा दिला. “ज्या दिवशी सत्ता परिवर्तन होईल, त्या दिवशी देशाच्या लुटीसाठी आणि मानहानीसाठी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. इंधन टंचाईच्या या मुद्द्याने आता केवळ राजकारणच नाही, तर थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत आणि देवाच्या प्रसादापर्यंत प्रवास केल्याने हा वाद येत्या काळात अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ