‘सिग्मा’ चित्रपटातून जेसन संजयचे पदार्पण; आईच्या नावाचा वापर केल्याने चर्चांना उधाण
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सध्या वैयक्तिक आयुष्यातील पडझडीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे विजयच्या आगामी ‘जननायकन’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट असताना, दुसरीकडे त्यांच्या २७ वर्षांच्या संसारात मोठी फूट पडल्याचे समोर येत आहे. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या बातम्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. विजयचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत कथित विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संगीता यांनी केल्याचे बोलले जात असून, या वादात आता त्यांचा मुलगा जेसन संजयनेही आपली भूमिका स्पष्ट केल्याचे चित्र दिसत आहे.
वडिलांना केलं अनफॉलो; नावातही बदल
विजय आणि संगीता यांचा मुलगा जेसन संजय लवकरच ‘सिग्मा’ या ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे. मात्र, या चित्रपटाच्या श्रेयावलीत (Credits) त्याने वडिलांचे नाव न वापरता ‘Jason Sanjay S.’ असे नाव दिल्याची जोरदार चर्चा आहे. येथील ‘S’ हे अक्षर त्याच्या आईच्या नावाचे (संगीता) असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, जेसनने सोशल मीडियावर आपल्या सुपरस्टार वडिलांना अनफॉलो केल्याने बाप-लेकातील दुरावा आता लपून राहिलेला नाही. आईच्या समर्थनासाठी जेसनने हे पाऊल उचलल्याचे चाहत्यांमध्ये बोलले जात आहे.
दिग्गज कुटुंबात संघर्षाची ठिणगी
१९९९ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या विजय आणि संगीता यांच्या नात्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतच्या अफवांमुळे दुरावा आल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. या कौटुंबिक कलहामुळे विजयचे चाहते चिंतेत असून, दुसरीकडे जेसन संजयच्या ‘सिग्मा’ या पहिल्याच चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लायका प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून जेसन आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असला तरी, त्याच्या नावातील बदलामुळे ‘थलपथी’च्या वारशाबाबत आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.




