हिरो बनण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांची मजेशीर कथा 15 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये झळकलेला आणि प्रेक्षकांच्या चर्चेत राहिलेला छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला घनश्याम आगामी मराठी चित्रपट ‘पिक्चर बॉईज’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काही तरुणांची धडपड आणि त्यातून घडणाऱ्या मजेशीर घटना या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. विनोदी ढंगात सादर केलेली ही कथा प्रेक्षकांना हलक्याफुलक्या मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. हा चित्रपट येत्या 15 मेपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी सांभाळले आहे.
चित्रपटातील गाण्यांचे बोल मंदार चोळकर, सुनील दोडगे आणि संध्या-प्रनिकेत यांनी लिहिले आहेत. तर संगीत वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी दिले आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते आणि एल. के. लक्ष्मीकांत या गायकांनी चित्रपटातील गाणी सादर केली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन तर रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.
या चित्रपटात प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख आणि घनश्याम दरवडे यांच्यासह नव्या-जुन्या कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची मेजवानी देणारा ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.




