बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या सारंगवाडी प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील एका नामांकित वॉटर फ्रंट कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने या कंपनीवर सुमारे 30 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता; मात्र तो अद्याप न भरल्याने अखेर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 2009 साली मंजूर झालेल्या सारंगवाडी प्रकल्पासाठी मेहकर तालुक्यातील हिवरा गाव परिसरात 2013 ते 2015 दरम्यान मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. या काळात महसूल विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जवळपास 10 लाख 64 हजार 320 घनमीटर इतके गौण खनिज काढण्यात आले. याशिवाय, त्या परिसरात क्रेशर मशीनचा वापर करून खनिज प्रक्रिया केल्याचेही निदर्शनास आले.
या प्रकाराची दखल घेत महसूल विभागाने संबंधित कंपनीवर तब्बल 30 कोटी रुपयांचा दंड आकारला होता. मात्र दंडाची रक्कम न भरल्याने हा विषय चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी विधिमंडळात उपस्थित केला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
मेहकरचे तहसीलदार यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पुणेस्थित कंपनीचे संचालक अनिल सुरेशचंद्र मुंदडा आणि हर्षद सुरेश मुंदडा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 379 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि खान व खनिज विकास व नियमन अधिनियम 1957 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




