विरोधकांकडून घोषणाबाजीमुळे लोकसभा तहकूब.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आजचा तिसरा दिवस गदारोळात सुरू झाला. लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नरेंदर-सरेंडर” अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी अमेरिके-इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम तसेच पेट्रोल-गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. सततच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी एकूण 10 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला असून मंगळवारी सुमारे सात तास चर्चा पार पडली होती. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात या मुद्द्यावर आपले मत मांडणार आहेत.
मंगळवारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी ओम बिर्ला यांच्यावर सभागृहाचे कामकाज पक्षपातीपणे चालवण्याचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला 50 हून अधिक खासदारांनी समर्थन दिल्यानंतर सभागृहाने त्यावर चर्चा करण्यास परवानगी दिली. चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अनेक वेळा बोलताना अडवण्यात आले आणि त्यांना वारंवार नियमपुस्तक दाखवण्यात आले. विरोधकांच्या मते सभापती सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत.
यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ओम बिर्ला सभागृहाचे कामकाज पूर्णपणे निष्पक्षपणे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते फारच कमी वेळा सभागृहात बोलतात आणि अधिवेशनाच्या काळात अनेकदा अनुपस्थित राहतात, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसेच तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांना ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. ऊर्जा, महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्प यामध्ये समाविष्ट आहेत.
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी एनडीएच्या सार्वजनिक सभेलाही संबोधित करणार आहेत. तसेच त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये द्रमुकवर टीका करत एनडीएची लोकप्रियता वाढत असल्याने डीएमके चिंतेत असल्याचा दावा केला आहे.




