spot_img

Solapur Weather : सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान 40 अंशांवर,नागरिकांना उष्माघाताचा इशारा

spot_img

आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरची गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. बाहेर पडताना अनेक नागरिक स्कार्फ, टोपी, गॉगल आणि रुमालाचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सध्या सकाळपासूनच सोलापूरमध्ये उन्हाचा चटका जाणवू लागतो, तर दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे वाहनचालक, कामगार, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी नागरिक चेहरा झाकून आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालून घराबाहेर पडताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे थंड पेयांची मागणीही वाढली असून बाजारपेठांमध्ये ताक, लिंबूपाणी आणि फळांच्या रसांची विक्री वाढल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे असा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

उष्णतेपासून बचावासाठी काय करावे?

  • बाहेर जाताना टोपी, गॉगल, छत्री किंवा स्कार्फचा वापर करावा.तहान नसली तरी वारंवार पाणी प्यावे.हलकी व सूती कपडे वापरावीत.
  • प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी डोक्याचे संरक्षण करावे.
  • शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, ताक, लिंबूपाणी यांचा वापर करावा.
  • चक्कर येणे, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • पाळीव प्राणी आणि पशुधन सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे.

उष्णतेच्या काळात काय टाळावे?

  • लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये.
  • दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे शक्यतो टाळावे.
  • जाड, घट्ट आणि गडद रंगाचे कपडे वापरू नयेत.
  • प्रखर उन्हात जास्त शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.
  • जास्त प्रथिनयुक्त अन्न, शिळे अन्न तसेच मद्य, चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळावे, कारण त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ