spot_img

Sangli Satyashodhak Wedding : सांगलीत पार पडला सत्यशोधक पद्धतीने साधा लग्नसोहळा, दिली लाखोंची सामाजिक देणगी

spot_img

महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जपणारा एक प्रेरणादायी विवाह सोहळा सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पार पडला. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सूरज आणि मधुमिता या जोडप्याने सत्यशोधक पद्धतीने अतिशय साध्या स्वरूपात लग्न करत समाजाला सकारात्मक संदेश दिला. विवाहातील दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्च टाळत त्यांनी जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम विविध सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली.

सूरज हा शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांवर काम करतो, तर मधुमिता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करते. सामाजिक कार्य करत असतानाच दोघांची ओळख झाली आणि समान विचारसरणीमुळे त्यांची मैत्री पुढे आयुष्यभराच्या नात्यात रूपांतरित झाली.

या दोघांनी लग्न करताना पारंपरिक आडनाव न लावता सर्वजण समान आहेत, हा संदेश दिला. विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा आणि पर्यावरण या मूल्यांना सप्तपदीचे रूप देत त्यांनी नव्या सहजीवनाची सुरुवात केली. दोघांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सक्षम असतानाही त्यांनी साधेपणाला प्राधान्य दिले. कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठिंबा देत “सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर” अशी भूमिका घेतली. त्यामुळे विवाह सोहळ्यात पुस्तक प्रदर्शन, विविध सामाजिक संस्थांच्या कामाची माहिती देणारे उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा प्रचार दिसून आला.

आजच्या काळात लग्नसमारंभांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना सूरज आणि मधुमिताचा हा विवाह समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. लग्न एकदाच होत असले तरी त्या पैशाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ