ब्रीच कँडी परिसरातील ६५० कुटुंबांचा तीव्र आक्षेप; पालिकेकडून आता ‘डेसिबल स्टडी’चे आदेश, तंत्रज्ञान की डोकेदुखी?
मुंबईच्या वाहतूक कोंडीवर जालीम उपाय ठरणारा कोस्टल रोड (सागरी किनारा मार्ग) गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच प्रयोगामुळे चर्चेत आला होता. हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून अमरसन्स गार्डन ते ब्रीच कँडी दरम्यानच्या ७०० मीटर पट्ट्यात ‘मेलडी रोड’ तयार करण्यात आला होता. या रस्त्यावरून ७० ते ८० किमी वेगाने गाडी चालवताना टायरच्या घर्षणामुळे ‘स्लमडॉग मिलेनियर’मधील प्रसिद्ध ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येते. पर्यटनाला चालना देणारी ही नाविन्यपूर्ण संकल्पना ११ फेब्रुवारी रोजी थाटामाटात सुरू झाली खरी, पण महिन्याभरातच या गाण्याचे सूर स्थानिक रहिवाशांसाठी कर्कश गोंगाट ठरू लागले आहेत.
ब्रीच कँडी परिसरातील सुमारे ६५० हून अधिक कुटुंबांनी या म्युझिकल रोडमुळे होणाऱ्या त्रासाबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. रहिवाशांच्या मते, रात्रंदिवस या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा आवाज त्यांच्या घरात घुसत असून शांततेचा भंग होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रहिवाशांना आपल्या घरातील खिडक्या उघड्या ठेवणेही कठीण झाले आहे. “हा रस्ता मनोरंजनासाठी की त्रासासाठी?” असा रोकडा सवाल उपस्थित करत स्थानिकांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ज्या सुरांनी पर्यटकांना भुरळ घातली, तेच सूर आता स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यात व्यत्यय आणत आहेत.
या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता बचावात्मक पाऊल उचलले आहे. पालिकेने सल्लागारांना (Consultants) या म्युझिकल रोडचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी आता ‘नॉईज डेसिबल स्टडी’ (ध्वनी तीव्रता अभ्यास) केला जाणार आहे. तांत्रिक भाषेत सांगायचे तर, साऊंड लेव्हल मीटरच्या सहाय्याने या रस्त्यावरून निर्माण होणारा आवाज निवासी क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या मर्यादेत आहे की नाही, याची तपासणी केली जाईल. हा अभ्यास निवासी भागातील शांततेचे नियम आणि पर्यावरणाचे निकष यावर आधारित असेल.
या अभ्यासाचा निकाल आल्यानंतर महापालिका या ‘मेलडी रोड’चे भवितव्य ठरवणार आहे. जर आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळली, तर हे संगीत थांबवण्यासाठी किंवा आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक ते बदल करावे लागतील. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे नागरी सुविधेमुळे स्थानिक नागरिकांना होणारा त्रास हा विकासाच्या वाटेतील एक मोठा पेच ठरत आहे. आता ‘जय हो’चे सूर कोस्टल रोडवर कायम राहणार की शांततेसाठी ते कायमचे थांबवले जाणार, हे येणाऱ्या तांत्रिक अहवालावरून स्पष्ट होईल.




