ओतूर,प्रतिनिधी:दि.७ मार्च [ रमेश तांबे ]
जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातून जेरबंद करण्यात आलेले २० बिबटे गुजरातच्या जामनगरमधील ‘वनतारा’ प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती जुन्नर चे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
जुन्नर वनविभागामध्ये मागील दहा वर्षांमध्ये वन्यप्राणी बिबट्यांचे मानवांवरील हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.जुन्नर वनविभागातील मानव-बिबट संघर्षाच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील असलेल्या जुन्नर व शिरुर भागातील पशुधन व मानवांवरील हल्ला झालेल्या संघर्ष क्षेत्रातील वन्यप्राणी बिबट्यांना पकडण्यात आलेले होते.
मानव-बिबट संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना जुन्नर वनविभागांतर्गत असलेल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. तथापि, माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता ५० एवढी असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे भारतातील इतर संरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार चर्चेअंती येथील ५० बिबट्यांना गुजरात राज्यातील जामनगर स्थित ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ( वनतारा ) येथे स्थानांतर करण्याबाबतच्या प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली ( सीझेडए ) यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास दि.२० डिसेंबर २०२५ रोजी मंजूरी प्राप्त झाली होती.
सदर परवानगीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर काल दि. ६ मार्च २०२६ रोजी ग्रीन्स
झुलॉजिकल रेस्क्यू अँण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा), जामनगर, गुजरात येथील २५ सदस्यीय पथक
पशुवैद्यकीय अधिकारी गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर येथे दाखल झाले.
त्यानुसार दि.७ मार्च रोजी डॉ. जितेंद्र रामगावकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम प्रदेश व श्री. आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली प्राप्त परवानगीमधील ५० पैकी २० बिबट्यांना ( १० नर व १० मादी ) वनताराच्या वातानुकुलीत व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनमध्ये यशस्वीरित्या पाठविण्यात आले आहे. सदर बिबट्यांचे सुरक्षितपणे स्थानांतर करण्यासाठी आवश्यक ती सर्व पशुवैद्यकीय व तांत्रिक खबरदारी घेण्यात आली आहे.
सदर स्थानांतरणाची प्रक्रिया अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) पश्चिम प्रदेश डॉ.जितेंद्र रामगावकर,आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नरचे उपवनसंरक्षक, प्रशांत खाडे,परिविक्षाधीन उपवनसंरक्षक लोकेश पाटील,सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस,सहायक वनसंरक्षक,अमृत शिंदे,जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण,ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे, वार्डल्ड लाईफ एस.ओ.एस कर्मचारी,तसेच इतर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.
जुन्नर वनविभागामार्फत मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असून नागरिकांनी वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




