कमिन्सच्या त्या प्रसिद्ध विधानाची आठवण; इंग्लंडच्या स्टार अष्टपैलूने टीम इंडियाला डिवचले
T20 वर्ल्ड कप २०२६ च्या रोमांचक वळणावर आजपासून उपांत्य फेरीला सुरुवात होत आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत होणार असली, तरी सर्वांच्या नजरा उद्या ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या हायव्होल्टेज सामन्यावर खिळल्या आहेत. मात्र, या ऐतिहासिक सामन्यापूर्वी इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कॅरन याने एक वादग्रस्त आणि धाडसी विधान करून खळबळ उडवून दिली आहे. वानखेडेवरील भारतीय चाहत्यांच्या जल्लोषाचा संदर्भ देत कॅरन म्हणाला, “हे एक भव्य मैदान आहे, पण मला खात्री आहे की गुरुवारी रात्री येथे खूप शांतता असेल.”
सॅम कॅरनच्या या विधानाने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पॅट कमिन्सची आठवण करून दिली आहे. त्यावेळी कमिन्सने अहमदाबादमधील १ लाख प्रेक्षकांना शांत करण्याचा इशारा दिला होता आणि तो खरा करून दाखवला होता. आता तोच ‘माईंड गेम’ सॅम कॅरन खेळताना दिसत आहे. भारताविरुद्ध विश्वचषकाची सेमीफायनल खेळणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते, असे सांगतानाच त्याने भारतीय प्रेक्षकांचा उत्साह कमी करण्याचे आव्हान दिले आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने येथे मोठी धावसंख्या उभी राहील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असली, तरी इंग्लंडचा संघ दबावाखाली नसल्याचे कॅरनने स्पष्ट केले. “आमच्या संघातील बहुतेक खेळाडूंना आयपीएलमुळे भारतीय परिस्थितीचा चांगला अनुभव आहे. आम्हाला फक्त एक ‘परफेक्ट गेम’ खेळायचा आहे,” असे तो म्हणाला. घरच्या मैदानावर भारतीय चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासमोर रोहितची सेना कॅरनचे हे आव्हान कसे परतावून लावते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उद्याचा हा सामना केवळ दोन संघांमधील नसून, मानसिकतेचाही मोठा लढा असणार आहे.




