पाण्याचे फुगे आणि रासायनिक रंगांनी बिघडवला सणाचा आनंद; केईएम, नायर रुग्णालयात जखमींवर उपचार
मुंबईत काल धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गल्लोगल्ली रंगांची उधळण, पाण्याचे फवारे आणि ‘होळी रे होळी’च्या घोषणांनी वातावरण रंगून गेले होते. मात्र, काहींसाठी हा आनंदाचा क्षण वेदनादायी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागांत रंग खेळताना झालेल्या दुर्घटनांमुळे एकूण १८ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामध्ये लहान मुलांचा समावेश सर्वाधिक असून, सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रासायनिक रंगांमुळे त्वचेची जळजळ होणे, डोळ्यांत रंग गेल्याने दिसण्यास त्रास होणे आणि पाण्याचे फुगे लागल्याने गंभीर जखमा होणे अशा तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत.
केईएम रुग्णालयातील चित्र अधिक चिंताजनक होते. तिथे दाखल झालेल्या ५ रुग्णांपैकी एका ५ वर्षांच्या चिमुरड्याच्या संपूर्ण अंगावर रंगांमुळे पुरळ आले होते, तर एका १० वर्षांच्या मुलीच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. धक्कादायक म्हणजे, पाणी भरलेले फुगे जोरात मारल्यामुळे कुणाच्या पाठीला तर कुणाच्या मांडीला अंतर्गत मार लागला आहे. नायर रुग्णालयात तर एका व्यक्तीचा रंग खेळताना दात पडल्याचीही घटना समोर आली आहे. सणाचा आनंद लुटताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांचा रंग फिका पडला असून, डॉक्टरांनी नागरिकांना नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.




