सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी विशेष अधिसूचना जारी केली आहे, ज्यात शहरातील सर्व खासगी बस तसेच जड व अवजड वाहनांसाठी ‘नो एन्ट्री’ लागू करण्यात आली आहे.
या अधिसूचनेची मुदत आता 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यानुसार, शहरातील सर्व खासगी बस थांबे, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स तसेच पार्किंग स्थळे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तपोवन येथील सिटीलिंक बस टर्मिनलवरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे. ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्लीपर्यंत मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कार आणि दुचाकी वाहने मुंबई नाका आणि टाकळीमार्गे वळविण्यात आली आहेत. शहरातील 29 रस्त्यांवरील दुरुस्ती आणि 5 उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत जड व अवजड वाहनांसह खासगी बस शहरात प्रवेश करू शकणार नाहीत.
सर्व खासगी बस थांबे, पिक-अप/ड्रॉप पॉइंट्स आणि पार्किंग स्थळे रद्द.
तपोवन सिटीलिंक बस टर्मिनलवर प्रवाशांचे चढवण-उतरण आणि पार्किंगची सोय राखली.
उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई होणार.
या उपाययोजनेमुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.




