‘आमचे दाराशी हाय शिमगा…या कोळी गीताने सध्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील कोळीवाडे दुमदुमून गेले आहेत. शिमगा अर्थात होळीचा सण उद्या येऊन ठेपला असून, प्रत्येक कोळीवाड्यात उत्साहाची लगबग सुरू झाली आहे. कष्टकरी पण तितकाच उत्सवप्रिय असलेला कोळी समाज हा सण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी शिमगा सण साजरा करतो.
विशेष म्हणजे शिमगोत्सवासाठी घराकडे परतलेल्या नौका आता बंदरकिनारी उभ्या करून रंगरंगोटीने नटत आहेत. रंगीबेरंगी पट्टे, झूल-झालरी, विविधरंगी झेंडे आणि शेंड्यावर डौलाने फडकणारा तिरंगा झेंडा यामुळे प्रत्येक होडीचे रूप खुलून गेले आहे. फुलांच्या आकर्षक माळांनी सजवलेल्या या होड्या जणू सणाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं चित्र सद्या सर्व कोळीवाड्या मध्ये दिसू लागलं आहे.या बाबत दिवाळे कोळीवाड्यातील कोळी भगिनीं रुपाली राजेंद्र कोळी यांनी दै. पुण्यनगरीशी बोलताना अशी माहिती दिली की,
पूर्वी फाल्गुन शुद्ध प्रतिपदे पासून पंधरा दिवस हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जायचा. यावेळी, चतुर्थीला होळीची सुरुवात म्हणून पहिली “बारकी हावली” किंवा “कोंबार हावली” म्हणून ओळखली जायची. ती होळी एरंडाच्या झाडासह जळाऊ लाकूड एकत्र करून पेटवली जायची. तर पौर्णिमेच्या दिवशी “मोठी हावली” किंवा “गोटाची हावली” ही मानाची असायची.
दरम्यान, होळी पोर्णिमेचा सण जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा कोळी बांधवांच्या आनंदाला उधाण येतो. समुद्रकिनारी वसलेला कोळी समाज या उत्सवाच्या स्वागताला आठवडाभर आधी सज्ज होतो. नाखवा जाच्यावर आपले पोट भरतो त्या लक्ष्मीला म्हणजेच होडीला सागरकिनारी आणून, तिला रंगरंगोटी करून होडीची मालकीण म्हणजेच नाखविणीच्या नव्याकोऱ्या साडीचा झेंडा तयार करून होडीला बांधला जातो.




