मुंबईतील चेंबूर परिसरातील सुभाष नगर भागात बांधकामस्थळी गंभीर अपघात घडला. एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर काम करत असताना सहा कामगार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीवर विटांचे काम सुरू असताना अचानक हे कामगार खाली पडले. प्राथमिक तपासात त्यांनी कोणतेही सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षात्मक साधनांचा वापर केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जखमी कामगारांना तातडीने राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत 55 वर्षीय रामल्लू यांचा मृत्यू झाला. तर 22 वर्षीय गुणधर राय यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उर्वरित उसराय (30), रमेश राय (25), विजय (25) आणि संदीप (27) यांच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष?
सुभाष नगर भागात म्हाडाच्या पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत अनेक इमारतींचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीही या परिसरात अशाच प्रकारची दुर्घटना घडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तरीही ठेकेदारांकडून आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन न केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते सुभाष मराठे यांनी, “कामगारांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नफेखोरीच्या नादात मूलभूत सुरक्षा उपायही राबवले जात नाहीत,” असा आरोप केला. सदर घटना इमारत क्रमांक 36 मध्ये घडल्याची माहिती असून, कामगारांकडे सेफ्टी बेल्ट नसल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




