वाल्मिक कराडचा जामीन पुन्हा फेटाळला; महादेव मुंडे प्रकरणातील नार्को अहवाल न्यायालयात सादर होणार.
जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले असून प्रकरणाचा खटला सध्या सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह पाच जण सध्या अटकेत आहेत, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराडने जामिनासाठी वारंवार अर्ज केले होते. मात्र सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाल्मिकचा मुलगा सुशील कराड याने फेसबुकवर एक पोस्ट करत “आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार” असा इशारा दिला आहे. त्यामुळे तो नेमके कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण की महादेव मुंडे प्रकरण—याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




