मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्यावर थेट नाव न घेता जोरदार टीका केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती होती.
भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, दादांच्या अकाली निधनानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. काहींनी शपथविधीबाबत घाई केल्याचा आरोप केला, त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला “अजित दादांना अग्नी देण्याआधी विलिनीकरणाची भाषा करणं योग्य होतं का?” तसेच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर साधं अभिनंदनपर ट्विटही न करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या जनतेला काहीच कळत नाही असं समजता का?” असा सवाल त्यांनी केला.
याशिवाय, अध्यक्षपदाची घोषणा आधीच केली असताना काही जण मुद्दाम एफआयआर आणि इतर प्रकरणांवरून स्टंटबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे सगळं आमची बातमी झाकण्यासाठी केलं जात आहे. माझ्यासारख्या माणसाला हे अतिशय किळसवाणं वाटतं,” अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.




