गारपीट, विजेच्या तडाख्याने शेती उद्ध्वस्त; हजारो शेतकरी अडचणीत.
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागात जोरदार सरी आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात सुमारे १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसला आहे. विभागीय अहवालात लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जनावरे दगावल्याची माहिती आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सोमवारी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाने जोरदार फटका बसला. बीड आणि लातूरमध्ये गारपीटही झाली. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरण होते. सुमारे १५,५१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून त्यात ८०८ हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले असून सुमारे १३६ गावे या आपत्तीच्या विळख्यात सापडली आहेत.
बीड जिल्ह्यातच ३,४०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, त्यात १,४६४ हेक्टर बागायती आणि ९५ हेक्टर फळपिकांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ६८ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.




