५८ टक्क्यांवर पोहोचला भत्ता; गुढीपाढव्याला मिळणार थकबाकीची मोठी रक्कम
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठी ‘गुड न्यूज’ घेऊन आले आहे. होळी आणि धुळवडीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून थेट ५८ टक्क्यांवर पोहोचला असून, ५ लाख १६ हजार कार्यरत कर्मचारी आणि ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त धारकांना याचा थेट फायदा होणार आहे.
हा वाढीव भत्ता जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. फेब्रुवारी २०२६ पासून ही वाढ रोखीने पगारात जमा होईल, तर जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये दिली जाईल. केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाची तयारी करत असतानाच राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला हा निर्णय महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे.




