spot_img

Otur News : चुकून बँक खात्यात जमा झालेले सव्वा दोन लाख रूपये प्रामाणिकपणे केले परत 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२६ फेब्रुवारी [ रमेश तांबे ]

जीवनाच्या प्रवासात क्वचितच प्रामाणिक माणसे भेटतात, आणि ती आयुष्यभर लक्षात राहतात.अनेकदा विविध घटनांद्वारे प्रामाणिकपणाचे दर्शन घडते,जे माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध करते.प्रामाणिकपणा हा माणसातील सर्वात मोठा गुण आहे.प्राचीन काळापासून जगातील सर्व भागांमध्ये प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा नैतिक गुणधर्म मानला जातो.असेच एक प्रामाणिकपणाचे दर्शन ओतूर येथे घडले आहे.ओतूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यात,चुकून जमा झालेले दिड लाख रूपये संबंधित शिक्षकाने प्रामाणिकपणे परत केल्याने,प्रामाणिकपणाचे दर्शन घडले असून, या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ओतूर ( ता.जुन्नर ) येथील सेवानिवृत्त शिक्षक दशरथ भिमाजी डुंबरे यांचे ओतूर येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत बचत खाते असून,डुंबरे यांच्या खात्यात दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी दिड लाख रूपये जमा झाल्याचा मेसेज डुंबरे यांच्या मोबाईलवर आला.डुंबरे यांनी, तात्काळ कुठलाही विलंब न लावता इंडियन ओव्हरसीज बँक ओतूर शाखेत जाऊन,माझ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ?, याबाबत खात्री केली असता,त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड लाख रूपये जमा झाल्याचे बँकेकडून सांगीतले. आपल्या खात्यात नजरचुकीने कुणाचे तरी पैसे आले असल्याची डुंबरे यांना खात्री झाली,मात्र या प्रामाणिक शिक्षकाने पैशाचा मोह टाळून, येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश जाधव यांच्याशी संपर्क साधून,माझ्या खात्यात जमा झालेले दीड लाख रूपये हे माझे नसून,कुणाचे तरी पैसे चुकून माझ्या खात्यात जमा झाले आहेत असे सांगून,हि रक्कम ज्यांची असेल त्यांना परत करा असे सांगीतले.


दरम्यान याच बँकेत नितीन हांडे यांचे माळशेज ऍग्रो नावाने करंट अकाउंट आहे,हांडे यांच्या खात्यात,संगमनेर जि. अहिल्यानगर येथील श्रीयश एजन्सी यांच्याकडून दिड लाख रूपये पाठवले होते. ते पैसे हांडे यांच्या करंट खात्यात जमा झाले नसल्याने,हांडे हे बँकेत चौकशी करण्यासाठी आले होते, तेव्हा चौकशी दरम्यान हांडे यांना संगमनेर येथून श्रीयश एजन्सी यांनी पाठवलेली रक्कम,चुकून दशरथ डुंबरे यांच्या बचत खात्यात जमा झाल्याचे बँकेच्या निदर्शनास आले.बँकेने डुंबरे यांच्या खात्यात नजरचुकीने जमा झालेली दीड लाख रूपयांची रक्कम श्रीयश एजन्सी यांना परत केली.

यापूर्वी दि.१० जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त शिक्षक दशरथ डुंबरे यांच्या बचत खात्यात ७५ हजार रूपये नजरचुकीने जमा झाले होते,त्याहीवेळेस डुंबरे यांनी सदरचे ७५ हजार रूपये प्रामाणिकपणे परत केले असल्याचे, इंडियन ओव्हरसीज बँक ओतूर शाखेचे शाखा व्यवस्थापक महेश जाधव यांनी सांगीतले. दरम्यान डुंबरे यांच्या बँक खात्यात नजरचुकीने जमा झालेली सव्वादोन लाख रूपयांची रक्कम,डुंबरे यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने डुंबरे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ