कॅलिफोर्नियातील टेक कंपन्या इराणच्या निशाण्यावर; १३ व्या दिवशी युद्धाचा भडका उडाला, एफबीआयचा हाय-अलर्ट जारी
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ आखाती देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. या भीषण युद्धाच्या १३ व्या दिवशी युद्धाची झळ थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ले चढवले असले, तरी इराणने ‘तोडीस तोड’ प्रत्युत्तर देत अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये हाहाकार उडाला असतानाच, आता अमेरिकेच्या सुरक्षेला मोठे खिंडार पडले आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले असून, अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांवर युद्धाचे सावट पसरले आहे.
सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या तंत्रज्ञान पंढरीवर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड’ (IRGC) कडून ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एफबीआयने (FBI) दिलेल्या इशाऱ्यानुसार, इराणचा उद्देश अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांना लक्ष्य करून जगभरातील सेवा क्षेत्र विस्कळीत करण्याचा आहे. जर हे हल्ले यशस्वी झाले, तर जागतिक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या संकटामुळे वॉशिंग्टनपासून सिलिकॉन व्हॅलीपर्यंत सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाह्य धोक्यासोबतच अमेरिकेला आता अंतर्गत शत्रूचाही सामना करावा लागत आहे. अमेरिकेत इराणचे तब्बल ७५० स्लिपर सेल्स सक्रिय झाले असल्याची माहिती समोर आली आहे. २०२५ मधील एका संसदीय बैठकीत खासदार बराद कन्नोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी पकडलेल्या १५०० संशयितांपैकी ज्या ७५० जणांची सुटका करण्यात आली होती, तेच आता अमेरिकेच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. “आम्हाला याची माहिती मिळाली असून आम्ही योग्य पावले उचलत आहोत,” असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले असले, तरी या स्लिपर सेल्समुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे युद्ध आता अनपेक्षित वळणावर पोहोचले असून त्याचे परिणाम जागतिक शांततेसाठी घातक ठरू शकतात.




