3 एप्रिलपासून थिएटरमध्ये हशांचा स्फोट.
सुपर डुपर या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नावाप्रमाणेच ट्रेलरही ‘सुपर डुपर’ ठरला आहे. विविध दमदार कलाकारांची एकमेकांशी स्पर्धा आणि विनोदाची फुल ऑन टायमिंग पाहून हा सिनेमा पूर्ण पैसा वसूल ठरेल, अशी चर्चा रंगली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स व सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या विभागाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. हा सिनेमा 3 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये एक भन्नाट कथा उलगडताना दिसते. एका फ्लॅटची चुकून दोन वेगवेगळ्या कुटुंबांना विक्री होते. एका बाजूला पारंपरिक मूल्य जपणारं गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचं शहरातलं तरुण जोडपं. एकाच घरात राहण्याची वेळ आल्यावर त्यांच्या जीवनशैलीतील फरकांमुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून उभा राहणारा विनोद हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.
स्थानात शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांसारख्या कलाकारांची दमदार कामगिरी आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या मते, हा सिनेमा केवळ हसवणारा नाही, तर नात्यांमधल्या गमती-जमती आणि भावनिक पैलूही हलक्या-फुलक्या शैलीत मांडणारा आहे. तर निर्मात्यांचं म्हणणं आहे की, प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायला लावणारा आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र अनुभवावा असा हा चित्रपट आहे.
येत्या उन्हाळ्यात ‘सुपर डूपर’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्य, भावना आणि कौटुंबिक नात्यांचा रंगतदार संगम घेऊन येणार आहे.




