पंतप्रधान प्रचारात मशगूल तर जनता रांगेत; खासदारांनी उडवला सरकारच्या ‘संवेदनशून्य’ धोरणांचा धिंडोरा
आखाती देशांमधील युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी गॅस आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. देशातील जनता गॅस एजन्सीबाहेर तासनतास रांगा लावत असताना पंतप्रधान मात्र केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुकीत व्यग्र असल्याचा आरोप राऊत यांनी केला. देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचा टोला लगावत त्यांनी, “नमो नमो हा मंत्र जपा किंवा जय श्रीराम म्हणा, म्हणजे पेट्रोल-डिझेल आणि गॅस आपोआप तुमच्या दारात येईल,” अशा शब्दांत सरकारची खिल्ली उडवली.
राऊत पुढे म्हणाले की, देशात खाद्यतेल, गॅस आणि इंधनाचे गंभीर संकट उभे ठाकले असताना पंतप्रधानांनी यावर अद्याप साधे भाष्यही केलेले नाही. निवडणुकीचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारी तिजोरीचा वारेमाप खर्च केला जात असून, देशाला अत्यंत ‘संवेदनशून्य’ नेतृत्व लाभल्याचे दुर्दैव त्यांनी व्यक्त केले. जागतिक राजकारणात भारताची प्रतिष्ठा रसातळाला गेल्याचा दावा करत, इराण-इस्रायल संघर्षावर भारताने घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकेकाळी भारताच्या परराष्ट्र धोरणाची जगात दखल घेतली जायची, मात्र आज पंतप्रधान कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर भारताने शोक व्यक्त न करणे, हे दबावाचे लक्षण असल्याचे सांगत राऊत यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही आसूड ओढले. सर्वसामान्य जनता महागाई आणि टंचाईच्या कात्रीत अडकलेली असताना सत्ताधारी केवळ निवडणुका जिंकण्याच्या इर्षेत मग्न असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.




