लेकीच्या सुरक्षेसाठी प्रियांका चोप्राने उचलले मोठे पाऊल
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिने आपल्या मुलीच्या, मालती मेरीच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट यांच्याप्रमाणेच प्रियांका आणि निक जोनास यांनीही आपल्या मुलीला सुरुवातीपासून कॅमेऱ्यांच्या झगमगाटापासून दूर ठेवले आहे. मात्र, नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना प्रियांकाने मालतीसोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा उल्लेख केला. मालती शाळेतून घरी येत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिचा घरापर्यंत पाठलाग करून तिचे व्हिडिओ काढले होते. या घटनेनंतर प्रियांका हादरून गेली असून तिने मालतीची सुरक्षा आता अधिक कडक केली आहे.
प्रियांका म्हणाली की, सेलिब्रिटी म्हणून तिचे आयुष्य सार्वजनिक असले तरी तिच्या मुलीला सामान्य मुलांसारखे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. “लोकांनी परवानगीशिवाय तिचे फोटो काढू नयेत, असे आम्हाला वाटते. मालतीने कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे वावरावे, यासाठी आम्ही तिला लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे प्रियांकाने स्पष्ट केले. आता मालती जेव्हा कधी घराबाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत चोख सुरक्षा व्यवस्था असते. आपल्या मुलीच्या खासगी आयुष्याबाबत तिने स्वतः निर्णय घ्यावा, तोपर्यंत तिची सुरक्षितता हीच आपली प्राथमिकता असल्याचे प्रियांकाने आवर्जून सांगितले.
या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या मातृत्वाच्या प्रवासावरही भाष्य केले. वयाच्या ३९ व्या वर्षी सरोगसीद्वारे आई झालेल्या प्रियांकाने सांगितले की, तिने तिशीमध्येच तिचे एग्ज (Eggs) फ्रीज केले होते. मालती आता चार वर्षांची झाली असून, तिची आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सल्ल्यानुसार तिने घेतलेला हा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला. प्रियांका आणि निक यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा चर्चा होत असली तरी, मालतीच्या संगोपनात आणि तिच्या सुरक्षेसाठी हे जोडपे सध्या अत्यंत गंभीर असून कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही.




