काबूलमधील रुग्णालयावर भीषण हल्ला, ४०० जणांचा मृत्यू; तालिबानचा सूड घेण्याचा इशारा
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, आता भारताच्या शेजारील देशांमध्येही युद्धाची ठिणगी पडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला असून, सोमवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यात काबूलमधील एका मोठ्या रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले असून, निवासी भागातील पाच ठिकाणी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या भीषण हल्ल्यात तब्बल ४०० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे कार्यालयही या हल्ल्याच्या निशाण्यावर होते.
तालिबान सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, “या भयंकर कृत्याचा बदला घेतला जाईल,” असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले होते, त्याचाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हा घातक हल्ला केल्याचे समजते. सोशल मीडियावर या हल्ल्याचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रुग्णालयाची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसत आहे. हल्ला इतका भीषण होता की बचावकार्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. आशिया खंडातील ही बिघडती सुरक्षा व्यवस्था पाहता, भारताने या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.




